सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर रिपाइंचे आक्रमक आंदोलन; ॲट्रॉसिटी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ebd7f88a-d377-414f-8600-c703fb79da25_1739266470764.webp

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ने तीव्र आंदोलन केले. सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

रिपाइंचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी यावेळी सोलापूरकर यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. वाडेकर म्हणाले, “सोलापूरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारली असली तरी डॉ. आंबेडकरांविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. हे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.”

शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी सोलापूरकर यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी करत, “महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा करावी,” असे म्हटले.

या आंदोलनात रिपाइंचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शैलेन्द्र चव्हाण, असित गांगुर्डे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महिपाल वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

रिपाइंच्या या आंदोलनामुळे सोलापूरकर यांच्या विधानांवर मोठी चर्चा रंगली असून पुढील काळात प्रशासनाची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Spread the love