वायसीएम रुग्णालयातील केंद्रीय औषध भांडारावर FDAचा छापा; १ कोटी ७२ लाखांचा औषधसाठा जप्त

0
IMG_20261120_124837

पिंपरी : पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय परिसरातील केंद्रीय औषध भांडारात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. उत्पादन परवानगीशिवाय तयार करण्यात आलेली अलोपॅथिक औषधे साठवून ठेवल्याचे तपासणीत उघड झाले. या कारवाईत तब्बल १ कोटी ७२ लाख ७५ हजार १२६ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.

जेजुरी येथील एका उत्पादक संस्थेने आवश्यक उत्पादन परवानगी न घेता तयार केलेली अलोपॅथिक औषधे वायसीएम रुग्णालयाच्या केंद्रीय औषध भांडारात आढळून आली. विशेष म्हणजे, या औषधांपैकी काही औषधांवर त्यांच्या दर्जाबाबत अप्रमाणित घोषणा करण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे औषधांच्या उत्पादन प्रक्रियेबरोबरच त्यांच्या गुणवत्ता आणि वैधतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर औषधसाठा जप्त करण्यात आल्याने औषध पुरवठा व्यवस्थेतील संभाव्य अनियमितता उघडकीस आली आहे.

रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या उत्पादन आणि गुणवत्तेबाबत नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत उत्पादन परवानगीशिवाय तयार झालेली औषधे रुग्णालयाच्या केंद्रीय औषध भांडारापर्यंत पोहोचलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून औषध पुरवठा साखळीतील जबाबदार घटकांची भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed