खालुंब्रेत प्रतिबंधित गुटख्याचा धंदा तेजीत; टेम्पोसह ९.८१ लाखांचा माल जप्त पोलिसांची कारवाई; गुटख्याची वाहतूक करणारे दोघे गुन्ह्यात अडकले, बंदी असतानाही अवैध व्यवसाय सुरूच!
महाळुंगे : शासनाने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातलेली असतानाही त्याची खुलेआम साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याचे खालुंब्रे येथील कारवाईतून पुन्हा समोर आले आहे. उत्तर महाळुंगे पोलिसांनी कारवाई करत मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पोसह तब्बल ९ लाख ८१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंदी केवळ कागदावरच आणि गुटख्याचा अवैध व्यवसाय मात्र जोमात, अशी परिस्थिती या कारवाईमुळे अधोरेखित झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (२२ नोव्हेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास खालुंब्रे गावातील एचपी पेट्रोल पंपाजवळील गल्लीत निशांत रमाकांत उपाध्याय (वय २३, रा. खालुंब्रे, मूळ उत्तर प्रदेश) हा दयाशंकर दुबे ऊर्फ दयाशंकर द्विवेदी (वय ३९, रा. देहूगाव) याच्या सांगण्यावरून टेम्पोमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला.
या प्रकरणी पोलीस शिपाई रोहित संजय शिंत्रे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी टेम्पो आणि प्रतिबंधित गुटख्यासह ९ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मात्र, प्रश्न केवळ एका टेम्पोतील गुटखा पकडण्यापुरता मर्यादित नाही. शासनाची बंदी झुगारून हा माल कुठून आणला जातो? त्याचा पुरवठा कोण करतो? परिसरात त्याची विक्री कोणामार्फत होते? या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचणार का? की एखादा टेम्पो पकडून कारवाईची औपचारिकता पूर्ण केली जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रतिबंधित गुटख्याची साखळी मुळापासून उखडून काढण्यासाठी पोलिसांनी केवळ वाहतूकदारांवर नव्हे, तर पुरवठादार आणि विक्रेत्यांवरही कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. पोलीस उपनिरीक्षक जावळे पुढील तपास करीत आहेत.