लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांसाठी महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे; १ मार्च रोजी लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार?

मुंबई: लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याची घोषणा सरकारने मागील अर्थसंकल्पात केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. निवडणुकीला तीन महिने उलटले असले तरी या वाढीव रकमेबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांचे लक्ष आगामी १ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याची घोषणा करू शकतात. महायुतीतील अनेक नेत्यांनीही याबाबत आशादायक संकेत दिले आहेत. मात्र, महिला व बालविकास विभागाने अद्याप अर्थ मंत्रालयाकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे या निर्णयाबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, आतापर्यंत पाच लाख महिलांना या योजनेंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या २.३ लाख, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांची १.१ लाख, तर कुटुंबात चारचाकी असलेल्या व नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या १.६ लाख आहे.
अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, अपात्र ठरलेल्या महिलांकडून यापूर्वी दिलेला निधी परत घेतला जाणार नाही. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला अनुसरून, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान जमा झालेली रक्कम महिला लाभार्थ्यांकडून मागे घेण्यात येणार नाही, अशी माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली आहे.
मार्च महिन्यात २१०० रुपयांची घोषणा होणार का, याकडे महिलांचे डोळे लागले असून या निर्णयाने महिलांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.