व्हॉट्सॲपवरील बनावट RTO चलानने ज्येष्ठ नागरिकाला २४.३५ लाखांचा गंडा!; ७० वर्षीय भाजीपाला वाहतूक व्यावसायिकाची सायबर फसवणूक; झारखंडमधून दोघांना अटक
पुणे : वाहनावरील प्रलंबित वाहतूक चलान तपासण्याच्या प्रयत्नात एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सॲपवर आलेली ‘RTO Challan’ नावाची APK फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर सायबर चोरट्यांनी मोबाईलचा अॅक्सेस मिळवून बँक खात्यातील रक्कम परस्पर वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी झारखंडमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.
बनावट ॲप इन्स्टॉल करताच मोबाईलचा ताबा
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिक महिंद्रा पिकअप वाहनातून भाजीपाला वाहतुकीचे काम करतात. त्यांच्या वाहनावर काही वाहतूक चलान प्रलंबित आहेत का, याची माहिती घेण्यासाठी त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेली ‘RTO Challan’ नावाची APK फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल व्यवस्थित काम करेनासा झाला.
या घटनेनंतर दोन दिवसांनी त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे संदेश मोबाईलवर आले. त्यानंतर खात्यातील रक्कम परस्पर वळवून तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी झारखंडमधून दोघांना अटक केली.
अनोळखी APK फाइलपासून सावध राहा!
वाहनाचे चलान तपासण्याच्या नावाखाली सायबर चोरटे नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या अनोळखी APK फाइल्स इन्स्टॉल केल्यास मोबाईलमधील माहिती आणि आर्थिक व्यवहार धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे वाहतूक चलान तपासण्यासाठी केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा अधिकृत ॲपचाच वापर करावा, असे आवाहन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.