येरवड्यात तडीपारीचा आदेश धाब्यावर! गावठी दारू विक्रीप्रकरणी तडीपार केलेल्या तीन महिला पोलिसांच्या ताब्यात; लक्ष्मीनगर परिसरात पुन्हा वावर; महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल

0
IMG_20261016_103019

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – गावठी दारू विक्रीच्या गुन्ह्यांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तीन महिलांनी तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार येरवड्यात उघडकीस आला आहे. लक्ष्मीनगर परिसरात पुन्हा वावरताना आढळलेल्या या तिन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा राजू चव्हाण (वय ४५), लक्ष्मी देवी राठोड (वय ४५) आणि अनुसया नीलेश राठोड (वय ३२, तिघीही रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी कारवाई करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.

तडीपारीनंतरही लक्ष्मीनगरात वावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलांविरुद्ध गावठी दारू विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तडीपारीचे आदेश लागू असतानाही त्या पुन्हा लक्ष्मीनगर परिसरात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तडीपारीच्या आदेशाचे पालन होत आहे की नाही, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गस्तीवरील पोलिसांची तत्पर कारवाई

येरवडा परिसरात पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे, पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण, लहू गडमवाड, शाम शिपणे आणि रुपाली टोपे हे गस्त घालत होते. त्यावेळी संबंधित महिला परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर कदम, सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार तसेच दत्तात्रय लिगाडे, महेश नलावडे, मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे आणि श्रीनाथ कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तडीपारीची कारवाई करूनही संबंधित व्यक्ती पुन्हा त्याच परिसरात आढळत असल्याने अशा आदेशांची प्रभावी अंमलबजावणी आणि पोलिसांच्या नियमित गस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed