पुणे: “ससून रुग्णालयाच्या बँक खात्यातून कोटींचा अपहार; तेरा आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा नकार”

sassoon-hospital-amey-thakur.jpg

पुणे: ससून रुग्णालयाच्या बँक खात्यातून ४ कोटी रुपयांचा अपहार प्रकरणात १३ आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला.

या प्रकरणात रुग्णालयाचे वरिष्ठ सहायक रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक नीलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, अधिपरिचारिका अर्चना अलोटकर, वरिष्ठ लिपिक दीपक वालकोळी, संतोष जोगदंड, दयाराम कछोटिया, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात; तसेच अनिता शिंदे, शेखर कोलार, आणि राखी शहा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

बंडगार्डन पोलिस ठाण्यात एकूण २५ जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल असून, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी तक्रार दिली आहे. ससून रुग्णालयाच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने व रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांनी मिळून ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये काढून, ते स्वतःच्या आणि इतर आरोपींच्या खात्यावर वर्ग केले. ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा अपहार झाल्याचे समोर आले. रुग्णालयाच्या आर्थिक नोंदींची तपासणी करताना हा गैरव्यवहार उघडकीस आला, ज्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून १३ आरोपींनी अर्ज केला असता, अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी त्याला विरोध केला. ‘गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, आरोपींनी संगनमताने हे कृत्य केले आहे. आरोपींनी अपहृत रकमेचा विनियोग कसा केला, यासह तपासात महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत, ज्यासाठी आरोपींची कोठडीत चौकशी होणे आवश्यक आहे. जामीन दिल्यास तपासात अडथळे येऊ शकतात,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Spread the love

You may have missed