पुणे: ३१ मेपर्यंत रस्ते व ड्रेनेज कामे पूर्ण करा, अन्यथा कारवाई – वाहतूक विभागाचा ठेकेदारांना इशारा

पुणे, २६ एप्रिल: शहरातील विविध भागांत सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण व मलनिस्सारण वाहिनीच्या कामांची गती वाढवण्याचे आदेश वाहतूक शाखेने दिले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करावीत, अन्यथा संबंधित ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला आहे.
महापालिकेने ही कामे विविध ठेकेदारांकडे सोपवली असून, त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे वेळेत न पूर्ण झाल्यामुळे आणि योग्य वाहतूक नियोजन न झाल्यामुळे शहरात प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली आहे.
वाहतूक शाखेच्या पाहणीनुसार जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये खोदकामांमुळे अनुक्रमे १३, २५ आणि १२ ठिकाणी वाहतूक कोंडीची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने सर्व पोलीस निरीक्षकांना योग्य सूचना दिल्या असून, ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्ते वेळेत दुरुस्त न झाल्यास पावसाळ्यात अधिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, यावर कठोर भूमिका घेण्याचा इशारा पोलीस उपायुक्त झेंडे यांनी दिला आहे.
शहरातील वाहतुकीच्या सुरळीततेसाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.