“कोंबडीचोर” च्या घोषणांनी सोलापुरात नितेश राणेंना विरोध; बेकायदेशीर फलकावर महापालिकेची कारवाई – व्हिडिओ

सोलापूर | प्रतिनिधी भाजपचे आमदार व मंत्री नितेश राणे यांच्या सोलापूर दौऱ्याला आज जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. “आला रे आला कोंबडीचोर आला” अशा घोषणांनी शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्याला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सात रस्ता परिसरात उभारण्यात आलेला बेकायदेशीर डिजिटल फलक महापालिकेने तातडीने हटवला.
नितेश राणे आज सोलापूर व अक्कलकोट दौऱ्यावर आले असताना विमानतळाबाहेरच त्यांच्या ताफ्याला शिवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष घोडके व अन्य शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी हातात कोंबडीचे चित्र असलेले फलक धरत आणि घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.
पहा व्हिडिओ
या आंदोलनामागचे कारण विचारले असता, घोडके यांनी सांगितले की, “नितेश राणे सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर अपमानास्पद भाष्य करतात. अशा व्यक्तीला सोलापूरच्या भूमीत पाऊल ठेवू द्यायचं नाही.” त्यांनी राणेंना इशाराही दिला की, “पुन्हा एकदा शिवसेना नेत्यांवर टीका केल्यास त्यांच्या गळ्यात कोंबडी बांधू.”
दुसरीकडे, राणे यांच्या स्वागतासाठी सात रस्त्यावर लावण्यात आलेला डिजिटल फलक परवानगीशिवाय उभारल्यामुळे महापालिकेने तात्काळ तो हटवला. यामुळे प्रशासनाच्या कारवाईचेही शहरात जोरदार स्वागत झाले.
या सर्व प्रकारामुळे राणे यांच्या दौऱ्याला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी ते आपला दौरा पूर्ण करून पुढे रवाना झाले.