गांजा साठ्याने पोलिस दलाची प्रतिमा डागाळली; गांजासह पोलिस कॉन्स्टेबल अटकेत; निलंबनाची कारवाई

IMG_20250121_120327.jpg

नंदुरबार, धडगाव: धडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात गांजा साठा आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पोलिस दल आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शशिकांत वसईकर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो धडगाव पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना वसईकर यांच्या घरात गांजा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी वसईकर यांच्या घरावर धाड टाकली असता तब्बल ९०० ग्रॅम गांजा आढळून आला.

गुन्हा दाखल; निलंबनाचा निर्णय
गांजा साठ्याच्या आरोपाखाली शशिकांत वसईकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून वसईकर यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वीची घटना उघडकीस
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईची माहिती तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. मात्र ती उघड न केल्याने स्थानिकांमध्ये नाराजी होती. सध्या वसईकर यांच्याकडे गांजा कसा आणि कुठून आला, याचा तपास सुरू आहे.

गांजा विक्रीचा संशय
संबंधित कर्मचाऱ्याने गांजाचा साठा विक्रीसाठी ठेवला होता का, याचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तसेच वसईकर अन्य कोणतेही अंमली पदार्थ किंवा गुटख्याचा साठा करत होते का, याचाही शोध घेतला जात आहे.

धडगाव परिसरात गांजा प्रकरणे गंभीर
धडगाव तालुक्यात वेळोवेळी गांजा शेतीवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. मात्र, या प्रकरणात स्वतः पोलिस कर्मचाऱ्याचाच सहभाग उघड झाल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. जिल्हा पोलिस दलाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

गांजा प्रकरणाने पोलिस दलाला धक्का
या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून जिल्ह्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास गतीने सुरू असून लवकरच संपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Spread the love