बदली न मिळाल्याचा संताप; पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर कार धडकवली! पुणे पोलीस दलात खळबळ; संतप्त कॉन्स्टेबलचा थेट आयुक्तांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न

0
IMG_20261104_114827

पुणे : अपेक्षित पोलीस ठाण्यात बदली न झाल्याने संतप्त झालेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने थेट पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार धडकवून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, संबंधित कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल भिसे असे संबंधित पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून, ते पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असल्याची माहिती आहे. पुणे पोलीस दलात नुकत्याच अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदली प्रक्रियेत आपल्याला अपेक्षित असलेल्या पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, बदलीचे आदेश जाहीर झाल्यानंतर अपेक्षाभंग झाल्याने ते नाराज होते.

याच नाराजीतून भिसे यांनी थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाकडे कारने धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार धडकवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेच्या वेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला आणि संबंधित कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

बदलीच्या नाराजीतून थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापर्यंत धडक देण्याचा प्रकार घडल्याने पोलीस दलातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच असा प्रकार घडल्याने पोलीस वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed