परवानाधारक स्पा सेंटरमध्ये घुसून खंडणी उकळण्याचा प्रयत्न; आरटीआय कार्यकर्त्यासह चौघांवर गुन्हा

0
IMG_20260618_134122

पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरातील एका परवानाधारक स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत बदनामीची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायप्रोफाइल टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कथित आरटीआय कार्यकर्ता, महिला सामाजिक कार्यकर्ती आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू सुरवसे, स्वाती गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्पा सेंटर चालक दीपक कोल्हापूरकर (वय ३८, रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे रावेत येथील मस्के वस्ती परिसरात अधिकृत परवानाधारक स्पा व मसाज सेंटर आहे. २३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपींनी स्पा सेंटरमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. स्पामध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत आरोपींनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भीतीपोटी फिर्यादीने आरोपींना तातडीने ५ हजार रुपये रोख दिले. उर्वरित ४५ हजार रुपयांसाठी आरोपींकडून सातत्याने फोनवर व प्रत्यक्ष भेटून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे स्पा सेंटरमध्ये आलेल्या एका ग्राहकालाही आरोपींनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. संबंधित ग्राहकाकडून ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५०० रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत रावेत पोलिसांनी संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस तपासातून या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारे इतर ठिकाणी खंडणी उकळल्याची प्रकरणे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

Spread the love

Leave a Reply