सातबारा नोंदीसाठी २० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; घोटावडेच्या महिला मंडल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा, एसीबीची कारवाई!

0
IMG_20261113_134247

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीमध्ये नाव नोंदविण्याच्या मोबदल्यात तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील महिला मंडल अधिकारी रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, स्वतःसह तलाठ्यासाठीही लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

रोहिणी गुप्ते या घोटावडे येथे वर्ग तीनच्या मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्या सदाशिव पेठ परिसरात राहतात. तक्रारदाराने मौजे केमसेवाडी येथे १२ आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या दोन क्षेत्रांची सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदीमध्ये नोंद करण्यात आली होती. या कामाच्या मोबदल्यात गुप्ते यांनी तक्रारदाराशी मोबाईलवर संपर्क साधून स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी मिळून दोन नोंदींचे २० हजार रुपये मागितल्याचा आरोप आहे.

लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने २४ जुलै २०२६ रोजी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने २८ जुलै रोजी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत रोहिणी गुप्ते यांनी स्वतःसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.

या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने गुप्ते यांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, पोलीस निरीक्षक अशोक गवारी आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

महसूल विभागात सामान्य नागरिकांना सातबारा आणि फेरफार नोंदींसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अशा कामांच्या मोबदल्यात लाचेची मागणी होत असल्याचे आरोप समोर येणे ही गंभीर बाब आहे. आता या प्रकरणाच्या तपासातून लाचेच्या मागणीमागील संपूर्ण व्यवहार आणि तलाठ्याची कथित भूमिका स्पष्ट होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed