पुणे: सिंहगड रोड परिसरातील गुन्हेगारावर कठोर कारवाई; नागपूर जेलमध्ये रवानगी
पुणे, प्रतिनिधी : दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्र बाळगणे आणि परिसरात दहशत निर्माण करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पुणे पोलिसांनी एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृत्ये) कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी संबंधित आरोपीला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
अमन अंबीर झारेकरी (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पूल, सिंहगड रोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन झारेकरी याच्याविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे तसेच तोडफोड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही बदल न झाल्याने एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपीला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमन झारेकरी याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार पंकज देशमुख आणि पोलीस अंमलदार अरविंद धावडे यांनी सहभाग घेतला.