येरवड्यात शासकीय निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यावर अल्पवयीनांचा हल्ला; तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

0
crime_cb084c

पुणे : महाराष्ट्र माझा – येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील (मुलांचे शासकीय निरीक्षणगृह) कर्मचाऱ्यावर तीन अल्पवयीनांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१६ ऑगस्ट) घडली. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

संतोष किसन कुंभार (वय ५०, रा. नंदादीप सोसायटी, चऱ्होली फाटा) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार हे येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते निरीक्षणगृहातील अल्पवयीन मुलांना नाश्ता वाटत होते. त्यावेळी एका किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.

या वादातून तीन अल्पवयीनांनी कुंभार यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत कुंभार गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तिन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देठे करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed