येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या कमानीवर एकाच लोकप्रतिनिधीचा नामफलक; इतरांचा अवमान की महापालिकेची ‘एकतर्फी’ कृपा?

0
IMG_20260818_010559

पुणे | येरवडा : महाराष्ट्र माझा न्युज- येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातील नूतनीकरण करण्यात आलेल्या कमानीवर एका लोकप्रतिनिधीचेच नाव झळकल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभाग क्रमांक ४, ५ आणि ६ मधील तब्बल १२ लोकप्रतिनिधींचा कारभार ज्या क्षेत्रीय कार्यालयातून चालतो, त्याच कार्यालयाच्या कमानीवर केवळ नगरसेविका अश्विनी ताई डॅनियल लांडगे यांचे एकेरी नामफलक लावण्यात आल्याने इतर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, नामफलकाबाबत यापूर्वीच क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आणि उपअभियंता यांना माहिती देण्यात आली होती. त्यावेळी “एकाच लोकप्रतिनिधीचे नाव लावले जाणार नाही; सर्वांची नावे लावू किंवा कुणाचेही नाव लावणार नाही,” असे आश्वासन देण्यात आल्याचा दावा मोहल्ला कमिटी सदस्यांनी केला आहे. मात्र, आश्वासनाचा फुगा फुटला आणि कमानीवर एकाच नावाचा फलक झळकला, अशी टीका आता केली जात आहे.

‘सर्वांसाठी कार्यालय, मात्र फलकावर एकच नाव!’ अशी उपरोधिक चर्चा येरवडा परिसरात सुरू झाली आहे. महापालिकेच्या निधीतून आणि शासकीय मालमत्तेवर उभारलेल्या सुविधेवर एखाद्या एकाच लोकप्रतिनिधीचे नाव लावण्याचा अधिकार प्रशासनाला नेमका कोणी दिला, असा सवालही उपस्थित होत आहे.

मोहल्ला कमिटी सदस्यांच्या म्हणण्यानुसार, तीन प्रभागांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुष असे एकूण १२ लोकप्रतिनिधी आहेत. मग नामफलकाच्या बाबतीत ‘समान न्याय’ कुठे गेला? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने सर्वांची नावे समान आकाराच्या फलकावर लावावीत किंवा कोणाचेही नाव न लावता केवळ ‘पुणे महानगरपालिका, येरवडा क्षेत्रीय कार्यालय’ असा शासकीय फलक लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत उपायुक्त, परिमंडळ क्रमांक १ यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित एकेरी नामफलक तातडीने हटवावा आणि सात दिवसांत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच परिमंडळ क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही शासकीय कार्यालयावर भविष्यात अशा प्रकारे एकेरी नामफलक लावू नये, यासाठी लेखी आदेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

‘लोकशाहीचा फलक असेल तर नावंही लोकशाहीनेच!’ असा टोला मोहल्ला कमिटी सदस्यांनी लगावत, महापालिका प्रशासनाने या प्रकरणात कोणाच्या ‘कृपादृष्टी’ने नव्हे तर नियमाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

निवेदनावर मोहल्ला कमिटी सदस्य संतोष सुकाळे, सलमा शेख, शशिकांत साटोटे, निताताई गागडे, रॉकी अटलूर, गणेश घायमुक्ते आणि एजाज खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed