पुणे पोलिस दलात बदलीचे वादळ; गोपनीयतेच्या भंगामुळे तिघांवर कारवाई, एका वरिष्ठाला ‘शिस्तभंगाची शिक्षा’, दुसऱ्याला मिळाले गिफ्ट

पुणे – शहरातील बाणेर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून, यामध्ये एका वरिष्ठाला शिक्षा म्हणून हटविण्यात आले तर दुसऱ्याला चांगल्या कामगिरीचे बक्षीस देण्यात आले आहे. याशिवाय, गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे.
फोटो व्हायरल प्रकरण गंभीर; तिघांवर कोसळला कारवाईचा धडाका
बाणेर पोलीस ठाण्यात कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या कालावधीत एका अंमलदाराचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकाराने पोलीस खात्याच्या गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांची मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सावंत यांना चांगल्या कामगिरीचे फळ
चंद्रशेखर सावंत यांनी मागील दीड वर्षांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रभावी कामगिरी बजावली होती. त्यांच्या प्रशंसनीय कार्यगुणांची दखल घेत त्यांची बदली बाणेर ठाण्यात करण्यात आली. त्यांच्या जागी वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांची शिवाजीनगर ठाण्याच्या वरिष्ठ पदावर नियुक्ती झाली आहे.
महिला अधिकाऱ्यांच्याही बदल्या; गोपनीयतेच्या भंगाचा आरोप
बाणेर पोलिस ठाण्यातील अंमलदाराचा फोटो प्रसारित झाल्यानंतर पुढील तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा दीपक जाधव आणि महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री आर. पाटील यांच्यावर गोपनीयतेच्या भंगाचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार, ऋतुजा जाधव यांची बदली खडक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, राजश्री पाटील यांची कोर्ट कंपनी आवारात नियुक्ती करण्यात आली आहे.
या घडामोडींमुळे पोलिस खात्यात अंतर्गत शिस्त आणि गोपनीयता याबाबत नव्याने चर्चा सुरु झाली असून, वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.