ससूनची हेल्पलाइन सुरू; तरीही आयसीयू बेडची प्रतीक्षा कायम; दररोज ५ ते ६ गंभीर रुग्णांना खाटेसाठी प्रतीक्षा; हेल्पलाइनला अल्प प्रतिसाद
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागावरील (आयसीयू) वाढता ताण गंभीर रुग्णांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. रुग्णालयातील विविध विभागांत मिळून १५१ आयसीयू खाटा उपलब्ध असल्या, तरी दररोज सुमारे ५ ते ६ गंभीर रुग्णांना आयसीयू खाटेसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. खाटांची उपलब्धता पूर्वीच समजावी, यासाठी प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. मात्र, या हेल्पलाइनला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने गंभीर रुग्णांना ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ससून रुग्णालयातील आयसीयूच्या बहुतांश खाटा कायमच भरलेल्या असतात. पुणे, पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या विविध भागांतून गंभीर रुग्ण उपचारासाठी ससूनमध्ये दाखल होतात. अपघात, गंभीर संसर्ग, श्वसनविकार, हृदयविकार तसेच विविध गुंतागुंतीच्या आजारांमुळे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बाहेरील रुग्णालयांतून गंभीर अवस्थेतील रुग्ण ससूनमध्ये हलविताना आयसीयू खाट उपलब्ध आहे की नाही, हा मोठा प्रश्न निर्माण होतो.
अनेकदा अन्य रुग्णालयांकडून रुग्णाला शेवटच्या क्षणी ससूनमध्ये हलविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, त्या वेळी आयसीयू खाट उपलब्ध नसल्यास उपचार सुरू करण्यास विलंब होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णाला ससूनमध्ये आणण्यापूर्वी खाटेची उपलब्धता तपासणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेल्पलाइनवर दररोज तीन-चार फोन
आयसीयू खाटांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी ससून प्रशासनाने ९२२५३३०५३५ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. या क्रमांकावर दररोज सरासरी तीन ते चार फोन येतात. आतापर्यंत सुमारे शंभर जणांनी आयसीयू खाटांच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली आहे. पुण्यासह विविध जिल्ह्यांतूनही या हेल्पलाइनवर संपर्क करण्यात आला आहे.
मात्र, गंभीर रुग्णांची संख्या आणि ससूनवर असलेला रुग्णभार पाहता हेल्पलाइनचा वापर अद्याप अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हेल्पलाइनची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्याची तयारी सुरू आहे.
आयसीयू खाटांची स्थिती
विभाग| एकूण खाटा| व्यापलेली टक्केवारी
सर्वसाधारण आयसीयू| २६| ९३.३%
ट्रॉमा| १६| ८९.६%
शल्यचिकित्सा| ७| ८६.२%
शिशु विभाग| ५९| ८६.०%
श्वसन विकार| १२| ९१.६%
बालक| १०| ९०.०%
बालक शल्यचिकित्सा| ६| ९०.०%
भाजलेल्या रुग्णांसाठी| ४| ७५.०%
हृदय शस्त्रक्रिया| ११| ३५.६%
एकूण| १५१| —
रुग्णालयात आणण्यापूर्वी संपर्क करण्याचे आवाहन
ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले की, हेल्पलाइन क्रमांकाबाबत अद्याप अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आगामी काळात याबाबत जनजागृती करण्यात येणार असून, गंभीर रुग्णांना आयसीयू खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी सांगितले की, रुग्णाला थेट ससूनमध्ये आणण्यापूर्वी नातेवाईकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधावा. रुग्णाच्या आजाराची माहिती घेतल्यानंतर ती संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविली जाते. त्यानुसार आयसीयू खाट उपलब्धतेबाबत माहिती दिली जाते. अनेकदा खाट उपलब्ध आहे की नाही, याची माहिती न घेता बाहेरगावाहून रुग्ण थेट ससूनमध्ये आणला जातो. अशा परिस्थितीत खाट मिळेपर्यंत रुग्णाला प्रतीक्षा करावी लागू शकते.
गंभीर रुग्णाला ससूनमध्ये आणण्यापूर्वी हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास अनावश्यक प्रतीक्षा आणि रुग्णाची होणारी गैरसोय काही प्रमाणात टाळता येऊ शकते.