पुणे: विना हेल्मेट शासकीय कार्यालयांत येणाऱ्यांना प्रवेशबंदी; शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी एकसमान नियम

पुणे: शासकीय कार्यालयांमध्ये दुचाकीने येणाऱ्या कर्मचार्यांसाठी हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय अखेर आजपासून (दि. २५) अंमलात आला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) विविध शासकीय कार्यालयांच्या बाहेर तपासणी पथके तैनात केली असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी
न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य परिवहन विभागाने हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या सर्व दुचाकीस्वार कर्मचार्यांनी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचार्यांवर तातडीने कारवाईचा इशाराही दिला आहे.
आरटीओची जनजागृती मोहिम
हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीपूर्वी आरटीओने कर्मचार्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली होती. तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोन वर्षांपूर्वीच या संदर्भात परिपत्रक जारी केले होते. मात्र, या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. आता आरटीओने पुढाकार घेत हा निर्णय अमलात आणला आहे.
नागरिकांवरही कारवाईचा इशारा
पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचार्यांवर कारवाई केली जात आहे. यानंतर शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या इतर दुचाकीस्वार नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
आरटीओच्या पथकांची तपासणी सुरू
पुण्यातील सरकारी कार्यालयांच्या बाहेर तपासणीसाठी आरटीओची पथके तैनात करण्यात आली आहेत. “विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार विविध शासकीय कार्यालयांबाहेर हेल्मेट तपासणी मोहीम राबवली जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी स्पष्ट केले.
सामान्य नागरिकांमध्ये संतोष
आरटीओच्या या कठोर अंमलबजावणीमुळे शासकीय कार्यालयांमध्ये सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.