पुणे: संविधानाचा अवमान: परभणीच्या घटनेचा वारजेत तीव्र निषेध

पुणे (वारजे) : परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या घटनेचा वारजे येथे तीव्र निषेध करण्यात आला. स्व. रमेश वांजळे हायवे चौकातील उड्डाणपुलाखाली विविध राजकीय पक्ष आणि दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध नोंदवला.
या वेळी उपस्थितांनी महापुरुषांसह संविधानाचा जयघोष करणाऱ्या घोषणा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. “संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात विनायक लांबे, दत्ता पाकिरे, दीपक बलाढे, रियाज शेख, चंद्रकांत कांबळे, अरविंद शिंदे, गुणवंत घोडके, अंकुश सोनवणे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
निषेध आंदोलनाला आश्विन ढगे, राजीव पाटील, नाना ओव्हाळ, किशोर म्हस्के, नितीन वांजळे, गोगा सुपेकर, संजय भडके, मल्लीनाथ लोंढे यांसह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, समाजकंटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा ठाम निर्धार या आंदोलनातुन व्यक्त करण्यात आला.