पुणे: महावितरण अभियंत्याची लाचखोरी उघड; दोन लाख घेताना रंगेहात पकडले

IMG_20241024_093552.jpg

मांजरी: नव्याने बांधकाम झालेल्या इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारून विद्युत पुरवठा सुरू करण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आणि दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या बंडगार्डन विभागातील कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले आहे. भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे या अभियंत्याचे नाव असून, एका विद्युत ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार हे शासन मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, त्यांच्या ओळखीच्या बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या पाच इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी उभारून विद्युत प्रवाह सुरू करण्याचे काम त्यांनी घेतले होते. त्यांनी या कामासाठी पाच फाईल्स तयार करून मंजुरीसाठी सावंत यांच्याकडे दिल्या होत्या. त्याचप्रमाणे, मांजरी येथील नव्याने बांधलेल्या इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर करण्यासाठीही प्रयत्न सुरू होते.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सावंत यांनी या पाच फाईल्स मंजूर करण्यासाठी आणि मांजरीतील डीपीवर वीज भार मंजूर करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर सावंत यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. एसीबीच्या पथकाने सापळा रचून सावंत यांना दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत.

Spread the love