पूणे: अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई; ६४ लाखांचा गुटखा आणि पिकअप गाड्या जप्त

n65269675917400224256499a33b86728dfa6d784084fa0a8fe50ca4876a1e8f37090911b683fd1eead5eff.jpg

पुणे: अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभाग आणि काळेपडळ पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत वडाचीवाडी रोड, घुले वस्ती, उंड्री येथील एका गोडाऊनवर छापा टाकून ७४ लाख ४४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत ६४ लाख ४४ हजार ६५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि १२ लाख रुपयांच्या चार पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी संपतराज पेमाराज चौहान (वय ३८, रा. कोंढवा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार अंबादास उनवणे यांनी या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने काळेपडळ पोलिसांसमवेत वडाचीवाडी रोडवरील गोडाऊनवर छापा टाकला. या गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाला सापडले. चौकशीत आरोपी चौहानकडून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करत असून, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे, पोलीस अमंलदार जाधव व पाटील यांनी ही कारवाई केली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Spread the love