राहुल सोलापूरकर प्रकरणी संताप : पोलिस आयुक्तांनी स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घ्या – उदयनराजे भोसले – पहा व्हिडिओ

पुणे: “अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याबाबत पोलिस आयुक्त काय बोललेत, हे मी पाहिलेलं नाही. पण जर कोणी त्यांना क्लीन चिट दिल्याचं म्हणत असेल, तर त्यांनी स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घेतलं पाहिजे,” अशा संतप्त शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवजयंती कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता उदयनराजे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित सध्याच्या लोकशाही व्यवस्थेचा गौरव करत म्हटलं, “आज आपण जी लोकशाही आचरणात आणतो, ती शिवरायांनीच रचलेली आहे.”
पहा व्हिडिओ
शिवजयंतीचा व्यापक उत्सव साजरा करण्यामागे शिवरायांची रयतेसाठी केलेली कर्तृत्वपूर्ण कार्ये असल्याचंही उदयनराजे म्हणाले. “इतर राजघराण्यांनी स्वतःच्या स्वराज्यासाठी लढा दिला, तर शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं,” असं त्यांनी नमूद केलं.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या योजनांची माहिती देत त्यांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची मागणी केली. “गडकिल्ल्यांसाठी निधी वापरणं योग्य ठरेल. यामुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल,” असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.