पुणेः येरवड्यात आयटी कंपनीतील महिलेला सहकाऱ्याचा जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

पुणेः शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येरवडा भागातील आयटी कंपनीतील एका महिलेवर सहकाऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शुभदा कोदारे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, ती आयटी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. मंगळवारी (दि. ७ जानेवारी) सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्यावर सहकाऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या शुभदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेचा तपशील:
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभदा कोदारे आणि आरोपी कृष्णा कनोजा हे एकमेकांच्या ओळखीचे होते. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. हल्ल्याच्या दिवशी शुभदा काम संपवून पार्किंगमध्ये घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी कृष्णा कनोजा तिथे आला आणि भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चॉपरने तिच्या उजव्या हातावर गंभीर वार केला.
हा हल्ला इतका तीव्र होता की, शुभदा खाली कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाईः
या घटनेनंतर येरवडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत आर्थिक वाद हा हत्येमागील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरः
या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आयटी कंपन्या आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.