सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात खड्ड्याची अर्धवट डागडुजी; दररोज वाहतूक कोंडी, पुणे खड्डेमुक्त करण्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह!
सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात खड्ड्याची अर्धवट डागडुजी; दररोज वाहतूक कोंडी, पुणे खड्डेमुक्त करण्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह!
पुणे | ३ नोव्हेंबर २०२६
पुणे शहर खड्डेमुक्त करण्याच्या दाव्यांवर प्रत्यक्ष रस्त्यांवरील परिस्थितीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात पाच ते सहा दिवसांपूर्वी काही कामासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला भाग केवळ अर्धवट बुजविण्यात आल्याने रस्त्याची दुरुस्ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
या अर्धवट कामामुळे संबंधित ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे पुणे महापालिकेकडून शहर खड्डेमुक्त करण्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे खोदकामानंतर रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती होत नसल्याचे अशा प्रकारांतून समोर येत आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांची गुणवत्ता आणि दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली जाते का, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हिंगणे परिसरातील या अर्धवट दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार? दररोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका कधी होणार? पुणे महापालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४