पुण्यात रेड्डी अण्णा बेटिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा; रेड्डी अण्णासह दहा जण पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी – प्रतिबंधित रेड्डी अण्णा नावाच्या बेटिंग वेबपोर्टलच्या माध्यमातून जुगार खेळविणाऱ्या टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गायकवाडनगर, पुनावळे येथील अॅडम व्हिले सोसायटीमध्ये छापा टाकून पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून, या प्रकरणात आकाश दास ऊर्फ जॅक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये पियुष शेषनारायण सोनी (१९), मुनेश्वर चुरानंद देवागन (१९), अजस अरुणकुमार सिन्हा (२४), हेमंतकुमार नारायण ठाकूर (२५), संजय माणिक परदेशी, माणिक पूरी (१९), हितेश पुनाराम देवांग (२७), सागर अशोक गजभिर (२७), अनिकेत हेमंत यादव (१९), अक्षय अमीन अस्थाना (२७) आणि फुलेंद्र अशोकराव कुमार (२७) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पुनावळे येथील गायकवाडनगरमधील अॅडम व्हिले सोसायटीत राहणारे आहेत.
फसवणुकीचे जाळे उघड
पोलिस तपासात आरोपींनी ऑनलाईन जुगारासाठी बनावट बँक खाते आणि सीमकार्ड वापरल्याचे उघड झाले आहे. संगणक व मोबाईलचा वापर करून या बनावट खात्यांद्वारे नागरिकांची फसवणूक करण्यात येत होती. आरोपींनी जुगार खेळवण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे खाते उघडून जुगाराचे पैसे हडप करण्याचे कारस्थान रचले होते.
७.४८ लाख रुपयांचे जुगार साहित्य जप्त
रावेत पोलिसांनी छाप्यात ७ लाख ४८ हजार १०० रुपये किमतीचे ऑनलाईन जुगार साहित्य जप्त केले आहे. यामध्ये विविध तांत्रिक साधने, बनावट बँक खाते, सीमकार्ड आणि मोबाईल यांचा समावेश आहे. रेड्डी अण्णा नावाने विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या या ऑनलाइन जुगार अड्ड्यामुळे नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रावेत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.