अल्पवयीन मुलांची बोनेटवरून धिंड; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या
पुणे : अल्पवयीन मुलांना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तब्बल १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत.
या बदल्यांमध्ये चार पोलीस अधिकारी आणि ११ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही अल्पवयीन मुलांना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली होती. पोलिसांच्या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्यानंतर तपासादरम्यान संबंधित पोलिसांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये तीन पोलीस उपनिरीक्षक आणि एका सहायक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.
गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तसेच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे आणि सद्दाम फकीर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
तर संबंधित ११ पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रशासकीय कारवाईमुळे अल्पवयीन मुलांशी संबंधित या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर सुरू असलेल्या चौकशीला आता अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.