येरवडा गावठाणात अतिक्रमणांवर महापालिकेची मोठी कारवाई; १४ पथाऱ्या, २२ शेड, २३ हातगाड्यांसह साहित्य जप्त; रस्ते आणि पदपथ मोकळे
पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील संपूर्ण येरवडा गावठाण परिसरात रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) मोठी कारवाई केली. या कारवाईत पथाऱ्या, शेड, हातगाड्या आणि काउंटरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईसाठी परिमंडळ क्रमांक १ ते ५ मधील संपूर्ण कर्मचारीवर्ग, १३ ओपन ट्रक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, दोन जेसीबी तसेच बिगारी सेवकांची यंत्रणा तैनात करण्यात आली होती. रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा करण्यात आला.




या मोहिमेत १४ पथाऱ्या, २२ शेड, २३ हातगाड्या, सहा काउंटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. अचानक आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर, परिमंडळ क्रमांक १ च्या उपायुक्त आशा राऊत तसेच महापालिका सहायक आयुक्त प्रकाश वालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
विभागीय अतिक्रमण अधिकारी नारायण साबळे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक सुभाष जगताप, संजय कुंभार आणि श्रीकृष्ण सोनार, अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, सहायक निरीक्षक अभिलेख कांबळे, श्लोक तारू, भरत बिरादार आणि विक्रम गोळे तसेच संपूर्ण अतिक्रमण पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
येरवडा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढेही वारंवार आणि नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण निरीक्षक राकेश काची यांनी दिली.