एस. पी. कॉलेज परिसरातील ७ अनधिकृत होर्डिंग्जना अभय कोणाचे? तक्रारीनंतरही महापालिकेची कारवाई थंडावली! आकाशचिन्ह विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; पुराव्यांसह तक्रारी करूनही कारवाई नसल्याचा सागर धाडवे यांचा आरोप

0
IMG-20261019-WA01422

पुणे : पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर असताना, टिळक रोडवरील एस. पी. कॉलेजच्या आवारातील सात कथित अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यास पुणे महापालिकेचा आकाशचिन्ह व परवाना विभाग विलंब का करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात २१ मे २०२६ रोजी अधिकृत तक्रार दाखल करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप युवक काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस सागर धाडवे यांनी केला आहे.

धाडवे यांच्या तक्रारीनुसार, संबंधित सात होर्डिंग्ज अनधिकृत असून, त्यांपैकी पाच होर्डिंग्जच्या संदर्भात होर्डिंगधारक कंपनी आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्यातील नोटरीकृत करारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांनी शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेला १ जुलै २०२६ आणि ५ ऑक्टोबर २०२६ रोजी कायदेशीर नोटिसा बजावल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन होर्डिंग्जप्रकरणीही तक्रार

याच परिसरातील अन्य दोन कथित अनधिकृत होर्डिंग्जविरोधात १९ मे २०२६ रोजी सागर धाडवे यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, संबंधित होर्डिंगधारक आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्यात वैध भाडेकरार नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा धाडवे यांनी केला आहे. या प्रकरणात पुणे महापालिका, महाराष्ट्र शासन आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

आकाशचिन्ह विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वारंवार तक्रारी करण्यात आल्याचे धाडवे यांनी सांगितले. मात्र, संबंधित होर्डिंग्जवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. कायदेशीर कागदपत्रे आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना, प्रशासनाकडून कारवाईला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, संबंधित होर्डिंग्जच्या माध्यमातून जाहिरात व्यवसाय सुरू असल्याने आर्थिक व्यवहार सुरूच असल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित होर्डिंग्जची कायदेशीर स्थिती तपासावी आणि नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही, तर पुणे महानगरपालिका मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सागर धाडवे यांनी दिला आहे. आता महापालिका प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि संबंधित होर्डिंग्जच्या वैधतेबाबत कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचा प्रश्न असा की, अनधिकृत होर्डिंग्ज असल्याच्या तक्रारी आणि कागदपत्रे समोर आल्यानंतरही कारवाई होत नसेल, तर त्यामागचे नेमके कारण काय?

Spread the love

Leave a Reply

You may have missed