पुणे : भीमनगर, वडारवाडीत अवैध धंद्यांवर विश्रांतवाडी पोलिसांचा धडक छापा; गुन्हेगारांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा कडक इशारा
पुणे (विशेष प्रतिनिधी):
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर, वडारवाडी परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विश्रांतवाडी पोलिसांनी कंबर कसली आहे. परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांनी या भागात थेट ठाण मांडले असून, अवैध धंदे करणाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कडक इशारा दिला आहे. पोलिसांच्या या सक्रिय भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भीमनगर आणि वडारवाडी परिसरात मटका, गांजा विक्री, हातभट्टीची अवैध दारू विक्री तसेच कोयता गँगशी संबंधित कारवाया आणि इतर बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे संपूर्ण डीबी (DB) पथक तसेच गुन्हे पोलीस निरीक्षक संपतराव हे स्वतः गेल्या आठ दिवसांपासून या भागात गस्त घालत असून ठाण मांडून आहेत.
या मोहिमेदरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना राजेंद्र पन्हाळे यांनी स्पष्ट केले की, परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय चालवले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट इशारा देत पोलिसांची अशा गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
नागरिकांसाठी २४ तास मोबाईल क्रमांक उपलब्ध:
या कारवाईदरम्यान एक विशेष पाऊल उचलत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी भीमनगर येथील बुद्ध विहारात जमलेल्या स्थानिक नागरिकांना थेट आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक दिला. परिसरात कोठेही अवैध धंदे सुरू असल्याचे दिसल्यास किंवा गुन्हेगारी कृत्य घडत असल्यास नागरिकांनी २४ तास कोणत्याही वेळी थेट संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे नागरिकांना गोपनीय व थेट माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचा सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे.