पुणे विमानतळावर कॅबचालकांची मनमानी; ‘नो पार्किंग’चे फलक शोभेसाठीच? वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!
पुणे : पुणे विमानतळावर अॅपवरील २९७ रुपयांचे भाडे दिल्यानंतरही पार्किंग शुल्काच्या नावाखाली १२५ रुपये अतिरिक्त मागितल्याचा आरोप समोर आला आहे. एकीकडे प्रवाशांकडून जादा पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी, तर दुसरीकडे विमानतळ परिसरातील ‘नो पार्किंग’च्या फलकांकडे दुर्लक्ष करून कॅब आणि तीनचाकी रिक्षा रस्त्यावर उभ्या राहत असल्याचे चित्र दिसत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मग हे फलक नियमांसाठी आहेत की केवळ शोभेसाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.


विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर विमाननगर वाहतूक शाखा असतानाही रस्त्यावरील बेकायदा पार्किंगवर प्रभावी कारवाई का होत नाही, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. काही स्थानिक नागरिक आणि चालकांकडून या व्यवस्थेत ‘हप्ते पद्धत’ सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
एरोमॉल प्रशासनाकडून तक्रारींवर कारवाई होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अतिरिक्त पैशांची मागणी आणि बेकायदा पार्किंगचे प्रकार कायम असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि संबंधित प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे? नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, की प्रवाशांनी आणि नागरिकांनी केवळ तक्रारीच करत राहायचे, असा टोचणारा सवाल उपस्थित होत आहे.