कल्याणीनगरमध्ये रेस्टॉरंट मालकासह बाऊन्सरची तरुणाला बेदम मारहाण; बेल्ट, काठ्या अन् दगडांचा वापर
पुणे : शहरातील आलिशान पब आणि रेस्टॉरंटसाठी प्रसिद्ध असलेल्या कल्याणीनगर परिसरात मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘पीपल्स अँड को’ (People’s & Co) रेस्टॉरंटच्या मागील बाजूस आणि समोरील प्रवेशद्वाराजवळ मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणाला रेस्टॉरंट मालकासह बाऊन्सर आणि अन्य दोघांनी बेल्ट, काठ्या व दगडांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी येरवडा पोलिसांनी रेस्टॉरंटचा मालक शरद मांडगे, त्याचा बाऊन्सर आणि अन्य दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मित्राला वाचवण्यासाठी गेला अन् स्वतःच गंभीर जखमी
या हल्ल्यात सुमित उर्फ स्मित नवनाथ मापारी (वय २३, रा. मोती कॉर्नर सोसायटी, टँक रोड, विश्रांतवाडी, पुणे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने कल्याणीनगरमधील रेस्टॉरंट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आलिशान रेस्टॉरंटमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पब आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नेमले जातात. मात्र, सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांकडूनच मारहाणीचे आरोप होत असतील, तर अशा आस्थापनांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील पुढील तपास येरवडा पोलिसांकडून केला जात आहे.