हडपसरमध्ये जन्मदाखल्यांसाठी विलंबाचे खापर अपुऱ्या मनुष्यबळावर!संगणक, नेटवर्क आणि सीआरएस प्रणालीतील अडचणींचाही फटका; आरोग्य अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती स्पष्ट
पुणे : हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात जन्मदाखले मिळण्यास होणाऱ्या विलंबामागे अपुरे मनुष्यबळ, संगणकांची कमतरता, नेटवर्कच्या समस्या आणि सीआरएस (CRS) प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असल्याचे समोर आले आहे. नागरिकांना जन्मदाखल्यांसाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या वृत्तानंतर हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घनवट यांनी या कामकाजातील अडचणींची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होतात. जन्म-मृत्यू नोंदींची पडताळणी, दाखल्यांमधील दुरुस्ती, नवीन सीआरएस प्रणालीमध्ये जुन्या नोंदींची नोंदणी आणि प्रकरणांना मान्यता देण्याची कामे या विभागामार्फत केली जातात. मात्र, उपलब्ध मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांच्या मर्यादांमुळे सर्व प्रकरणांचा वेळेत निपटारा करताना अडचणी येत असल्याचे डॉ. घनवट यांनी नमूद केले आहे.
निवडणुकीच्या कामाचाही परिणाम
जन्म-मृत्यू नोंदींची पडताळणी आणि प्रकरणांना मान्यता देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘अप्रूव्हल क्लार्क’ यांची एसआयआर (Special Intensive Revision) तसेच इतर निवडणूकविषयक कामांसाठी नियुक्ती केली जाते. त्यामुळे जन्म-मृत्यू विभागाच्या नियमित कामकाजावर परिणाम होऊन प्रकरणे प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण होते. विभागाकडे कामाच्या तुलनेत आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसल्याने अतिरिक्त मनुष्यबळासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एकाच यूजर आयडीवर कामकाज
सीआरएस प्रणालीमध्ये जुन्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदी करण्यासाठी सध्या केवळ एकच यूजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध असल्याने नोंदणी व मान्यतेची प्रक्रिया समांतरपणे करणे शक्य होत नाही. परिणामी, प्रकरणांचा निपटारा करण्याच्या गतीवर मर्यादा येत आहेत. याशिवाय, अपुरे संगणक संच आणि इंटरनेट-नेटवर्कची अनियमित उपलब्धता यामुळे ऑनलाइन नोंदणी, पडताळणी आणि मान्यतेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे पत्रात नमूद आहे.
जुन्या दाखल्यांसाठी दुहेरी प्रक्रिया
सन २०१९ पूर्वीच्या जन्म-मृत्यू दाखल्यांची नवीन सीआरएस प्रणालीमध्ये नोंदणी करताना संबंधित अर्ज प्रथम कसबा क्षेत्रीय कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागतो. मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा नोंदणी करून संबंधित प्रकरण जिल्हा निबंधकांकडे मान्यतेसाठी पाठवावे लागते. या प्रक्रियेतही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने नागरिकांना दाखले मिळण्यास विलंब होतो.
अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांची मागणी
जन्म-मृत्यू विभागाच्या कामकाजाव्यतिरिक्त क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे वैद्यकीय तपासण्या, खासगी रुग्णालये व दवाखान्यांची पाहणी, तक्रारींचे निराकरण, अहवाल आणि पत्रव्यवहार यांसारख्या जबाबदाऱ्याही आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर सर्व कामे वेळेत पूर्ण करताना अडचणी येत असल्याचे कार्यालयाने म्हटले आहे.
जुन्या सीआरएस दाखल्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वगळता इतर प्रकरणांमध्ये नागरिकांना तातडीने दाखले उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात येत असल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे. नागरिकांना वेळेत आणि अचूक सेवा देण्यासाठी कार्यालय कटिबद्ध असून, विभागाच्या वाढत्या कामाचा विचार करून अतिरिक्त मनुष्यबळ, संगणक संच, नेटवर्क सुविधा आणि आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डॉ. स्वाती घनवट यांनी केली आहे.
आता वरिष्ठ प्रशासन या अडचणी दूर करून नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.