पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: चार टोळ्यांवर MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल

पिंपरी (प्रतिनिधी): आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 सुरक्षित आणि शांततामय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर पावले उचलली आहेत. या अनुषंगाने चार संघटित गुन्हेगारांच्या टोळ्यांवर MCOCA अंतर्गत कारवाई करत एकूण 33 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने यावर्षी आतापर्यंत 30 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून 175 गुन्हेगारांना MCOCA अंतर्गत अटक केली आहे. हिंजवडी, सांगवी, वाकड, भोसरी यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांनी खुन, गंभीर दुखापत, अपहरण, खंडणी आणि दरोड्याचे गंभीर गुन्हे केले होते.
हिंजवडी पोलीस ठाण्याने टोळी प्रमुख विष्णु दिगंबर पवार आणि त्याच्या साथीदारांवर 9 गुन्हे नोंदवले आहेत. सांगवी पोलीस ठाण्याने राजू बापुराव देशमुख यांच्या टोळीवर 9 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याने बाळासाहेब बळीराम बांगर यांच्या टोळीवर 9 आणि सुरज प्रकाश रणदिवे यांच्या टोळीवर 4 गुन्हे नोंदवले आहेत.
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी या सर्व टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
ही कारवाई आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्वाची पाऊल ठरली आहे.