अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष
पुणे, प्रतिनिधी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्यविषयक सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने ‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजने’साठी शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या निर्णयाची माहिती दिली.
‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना’ अंतर्गत कर्करोग, मूत्रपिंड विकार, हृदयविकार यांसारख्या गंभीर आणि खर्चिक आजारांनी ग्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत दिली जाते. या योजनेमुळे अल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंबांना उपचारांसाठी मोठा आर्थिक आधार मिळत आहे.
सध्या या योजनेशी संबंधित नवीन सभासदत्व ओळखपत्र देणे, नूतनीकरण, हमीपत्र मंजुरी तसेच कागदपत्रांची पडताळणी यांसारख्या सर्व प्रक्रिया महापालिकेच्या मुख्य इमारतीतील मध्यवर्ती आरोग्य विभागामार्फत राबविल्या जातात. त्यामुळे शहराच्या विस्तारित भागातील नागरिकांना किरकोळ दुरुस्ती किंवा कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठीही मुख्य कार्यालयात वारंवार जावे लागत होते.
वानवडी, साळुंखे विहार, हडपसर, उंड्री, महंमदवाडी, कोंढवा, धनकवडी, कात्रज, सिंहगड रस्ता आदी परिसरातील नागरिकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत होता.
या पार्श्वभूमीवर सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करून कागदपत्र पडताळणी, अर्ज स्वीकृती आणि प्राथमिक मंजुरीची प्रक्रिया स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच सेवा मिळणार असून योजनेचा लाभ अधिक वेगाने मिळण्यास मदत होणार आहे.
स्थायी समितीच्या मंजुरीमुळे महापालिकेच्या आरोग्य योजनांचे विकेंद्रीकरण होऊन लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.