गुटखा विक्रीच्या नावाखाली पोलिसाकडून खंडणीची मागणी; साथीदारासह १.६५ लाख रुपये घेतले; पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप; पोलीस शिपायासह दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
a9b8873b-4ee1-4927-98ed-d48f15c62492_1791875588569

पुणे : किराणा दुकानात गुटखा विक्री होत असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उरुळी देवाची परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई रामकिसन हंबर्डे आणि त्याचा साथीदार सतीश मोरे (रा. वडकी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडजोडीनंतर दोघांनी मिळून दुकानदाराकडून एक लाख ६५ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात किराणा माल विक्रीचा व्यवसाय आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी पोलीस शिपाई हंबर्डे आणि त्याच्यासोबत असलेला सतीश मोरे हे दुकानात आले. दुकानात गुटखा विक्री होत असल्याचे सांगत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी पोलीस कर्मचाऱ्याने दुकानदाराला दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे दुकानदाराने सांगितल्यानंतर तडजोडीत एक लाख ६५ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारानंतर दुकानदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

सीसीटीव्ही चित्रीकरणातून प्रकार उघड

दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पोलिसांनी तपासणी केली. संबंधित चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. सीसीटीव्हीमध्ये पोलीस कर्मचारी साध्या वेशात दुकानात आल्याचे आणि दुकानातील कामगाराने रोकड आणून त्याला दिल्याचे दिसून आल्याची माहिती आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे संभाषणही चित्रीकरणात आढळल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी पोलीस शिपाई रामकिसन हंबर्डे आणि सतीश मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्यांना धमकावण्याच्या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed