‘रुबी अलकेअर’चे कंत्राट जाण्याच्या भीतीने डॉक्टरला त्रास? YCMच्या अधिष्ठात्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा
पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCM) माजी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरला जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमानित केल्याच्या आरोपावरून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नामदेव वाबळे यांच्याविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पिंपरीतील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
डॉ. ज्ञानेश्वर विश्वनाथ बोराडे (वय ४५, रा. धायरी, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवेतून कमी करण्यावरून वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. बोराडे हे YCM रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवेत रुजू होणे, गैरहजेरी, विभागीय चौकशी तसेच सेवेतून कमी करण्याच्या कारवाईवरून त्यांचा डॉ. वाबळे यांच्याशी वाद सुरू होता. या संदर्भात त्यांनी विविध शासकीय व वैद्यकीय संस्थांकडे तक्रारी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
अनुभव प्रमाणपत्रावरून वाद; जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप
१० ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास डॉ. बोराडे अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी YCM रुग्णालयात गेले होते. दुसऱ्या मजल्यावरील लिफ्टसमोर त्यांची डॉ. वाबळे यांच्याशी भेट झाली. अनुभव प्रमाणपत्रातील नियुक्तीबाबतच्या नोंदीवरून विचारणा केली असता, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सेवेतून कमी केल्याचा उल्लेख करीत जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमान केल्याचा आरोप डॉ. बोराडे यांनी केला आहे. त्यावेळी काही रुग्ण तसेच इतर व्यक्ती उपस्थित असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
‘रुबी अलकेअर’च्या कंत्राटाचा संदर्भ
दरम्यान, डॉ. बोराडे यांनी केलेल्या आरोपांमध्ये YCMमधील हृदयरोग उपचारसेवेशी संबंधित ‘रुबी अलकेअर’च्या कंत्राटाचाही संदर्भ देण्यात आला आहे. आपण रुग्णालयात हृदयरोगाची सेवा प्रभावीपणे दिल्यास संबंधित खासगी रुग्णालयाचा व्यवसाय आणि भविष्यातील आर्थिक हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो, या कारणातून आपल्यावर कारवाई व त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या आरोपांमुळे YCM रुग्णालयातील प्रशासकीय कारभार, डॉक्टरांमधील वाद आणि खासगी वैद्यकीय सेवेशी संबंधित कंत्राटांचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनीषा कदम करीत आहेत.