रेशनिंगचा गहू जनतेसाठी की काळ्या बाजारासाठी? लासुर्णेत २५ हजार किलो गहू पकडला; ट्रकसह २१.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
saamtv_2021-06_e45f36d8-cff7-4fe4-be3b-7c3e52fc6baa_Truck_With_Illegal_ration_grain

लासुर्णे : गरिबांच्या ताटात पोहोचण्यासाठी शासनाकडून वितरित होणाऱ्या रेशनिंगच्या धान्यावरही काळ्या बाजाराची नजर असल्याचा धक्कादायक प्रकार लासुर्णे (ता. इंदापूर) येथे उघडकीस आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय असलेला तब्बल २५ हजार किलो रेशनिंगचा गहू ट्रकसह पकडण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी २१ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष म्हणजे, रेशनिंगचा गहू शासकीय गोदामातून दुसऱ्या शासकीय गोदामात पोहोचवण्याची जबाबदारी असताना तो मध्येच लासुर्णेपर्यंत कसा पोहोचला, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शासकीय धान्याचा प्रवास गोदामापासून गरिबांच्या घरापर्यंत व्हायला हवा; मात्र तो काळ्या बाजाराच्या दिशेने वळला असेल तर त्यामागे नेमका कोणाचा ‘हात’ आहे? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

या प्रकरणी ट्रक चालक विलास नारायण गावडे (वय ५३, रा. डाळज नंबर) आणि हगारेवाडीचे माजी सरपंच सतीश सुखदेव हगारे (रा. हगारेवाडी) यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी पकडला ट्रक; प्रशासनाला कळण्यापूर्वी जनतेनेच दाखवली ‘सतर्कता’

१६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लासुर्णे येथील बोरी चौकातून रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा संशय नागरिकांना आला. गोरख अंकुश धापटे (वय ३९, रा. हगारेवाडी) यांच्यासह सात-आठ नागरिकांनी ट्रक अडवून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला.

ट्रकमध्ये ५० किलो वजनाच्या तब्बल ५०० गोण्या आढळून आल्या. म्हणजेच एक-दोन गोण्या नव्हे, तर तब्बल २५ हजार किलो गहू वाहून नेला जात असल्याचे समोर आले.

मोहोळला जायचा गहू लासुर्ण्यात कसा आला?

पोलिसांच्या माहितीनुसार, हा गहू सोलापूर येथील शासकीय गोदामातून भरून मोहोळ येथील शासकीय गोदामात खाली करायचा होता. मात्र, तो लासुर्णे येथे आढळल्याने वाहतुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, विलास गावडे आणि सतीश हगारे यांनी संगनमत करून हा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी लासुर्ण्यात आणल्याचा संशय आहे. सरकारी गहू ‘सरकारी मार्गावरून’ न जाता मध्येच दुसऱ्याच मार्गावर वळला की काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

गहू ६.२५ लाखांचा, ट्रक १५ लाखांचा

या कारवाईत पोलिसांनी ६ लाख २५ हजार रुपये किमतीचा २५ हजार किलो गहू आणि १५ लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण २१ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कार्यरत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गहू शासकीय गोदामातून बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणी पोहोचेपर्यंत कोणालाच त्याचा पत्ता कसा लागला नाही, हा प्रश्नही तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला असेल, तर केवळ ट्रक पकडून प्रकरण संपणार नाही; या गव्हाचा मार्ग कुठून सुरू झाला आणि तो कुठे पोहोचणार होता, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून, आता तपासातून या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड होणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे पुढील तपास करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed