अग्निसुरक्षा नसलेल्या ११ पीजी-हॉस्टेलवर सीलची कारवाई; लोहगाव-निंबाळकरनगरमध्ये तपासणीत धक्कादायक प्रकार; अग्निशमन यंत्रणेसह आवश्यक परवानग्यांचा अभाव
पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र माझा न्युज – देशभरात आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असताना पुणे शहरातील पीजी, हॉस्टेल, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच विविध आस्थापनांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरात विशेष अग्निसुरक्षा तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत लोहगाव आणि निंबाळकरनगर परिसरातील पीजी व हॉस्टेलची तपासणी करण्यात आली. यावेळी अग्निसुरक्षेची आवश्यक साधने आणि परवानग्या नसलेल्या ११ पीजी व हॉस्टेलवर सीलची कारवाई करण्यात आली.
मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तीन ते चार मजली इमारतींमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहत असल्याचे आढळून आले. मात्र, आग लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करण्यासाठी आवश्यक कायमस्वरूपी अथवा तात्पुरती अग्निशमन यंत्रणा अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे समोर आले.
तपासणीमध्ये केवळ अग्निसुरक्षेची साधनेच नव्हे, तर संबंधित इमारतींच्या आवश्यक परवानग्यांचीही पाहणी करण्यात आली. बिल्डिंग परमिशन, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वृक्ष, स्ट्रक्चरल स्थैर्य, कर विभाग तसेच अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) यापैकी अनेक आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, परिसरातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना संबंधित पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहण्याचा सल्ला दिला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनधिकृत आणि विनापरवाना निवासव्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित व्यक्तींचीही चौकशी करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
नियमांचे उल्लंघन करून पीजी किंवा हॉस्टेल चालविणाऱ्या जागामालकांसह संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भंगार दुकानांवरही नजर
अग्निशमन विभागाच्या विशेष मोहिमेत भंगार दुकानांचीही तपासणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कागद, लाकूड, पत्रे, स्टील, लोखंड तसेच अन्य ज्वलनशील साहित्याचा साठा आढळून आला. काही युनिटमध्ये अग्निसुरक्षा साधने, अग्निशमन यंत्रणा, बांधकाम परवानगी तसेच योग्य वीज वितरण व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले.
निवासी भागात पत्र्याचे शेड उभारून व्यवसाय सुरू असल्याचेही काही ठिकाणी आढळले. अशा ठिकाणी आग लागल्यास ती वेगाने पसरून नागरिकांच्या जीवितास तसेच मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने संबंधितांना त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मोहीम यापुढेही सुरू राहणार
महापालिकेच्या अग्निशमन विभागासोबत बांधकाम व संबंधित विभागांचे अधिकारी या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत. शहरातील पीजी, हॉस्टेल, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच अन्य आस्थापनांची तपासणी यापुढेही सुरू राहणार आहे.
अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अथवा आवश्यक परवानग्या नसलेल्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यासह सीलची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारे व्यवसाय अथवा निवासव्यवस्था सुरू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.