मुख्य विसर्जन मिरवणुकीत यंदा १५० गणेश मंडळांना ‘नो एन्ट्री; मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी पोलीस-मनपा प्रशासनाचा निर्णय; चार प्रमुख मार्गांवरील गर्दी नियंत्रणावर भर

0
IMG_20260921_111149

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र माझा न्युज – पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी यंदा पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत तात्पुरत्या स्वरूपात मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी मिळालेल्या सुमारे १५० गणेश मंडळांना यंदा मुख्य मिरवणूक मार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी संबंधित गणेश मंडळांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. गेल्या तीन-चार वर्षांत शहरातील विविध भागांतील सुमारे १५० मंडळांनी विशेष परवानगी घेऊन मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर प्रवेश मिळवला होता. मात्र, यंदा ही अतिरिक्त परवानगी न देण्याची भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे.

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरून काढली जाते. या मार्गांवर दरवर्षी मोठ्या संख्येने गणेश मंडळे सहभागी होत असल्याने मिरवणुकीला मोठा कालावधी लागतो.

२०२२ मध्ये या चार प्रमुख मार्गांवरून ६०८ मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ही संख्या वाढून १,०१५ झाली. दरम्यान, यंदा पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या सुमारे ४,१७० झाली आहे.

गतवर्षी म्हणजेच २०२५ मध्ये मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण होण्यासाठी तब्बल ३२ तास २६ मिनिटे लागली होती. अखेरच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनापर्यंत संपूर्ण प्रक्रिया जवळपास ३४ तास सुरू होती.

मिरवणुकीदरम्यान मंडळांकडून मार्गावर घेतले जाणारे थांबे, वाढती गर्दी, ढोल-ताशा पथके आणि मिरवणूक मार्गावरील विविध अडथळे यामुळे मिरवणुकीचा वेग मंदावतो. परिणामी विसर्जनाचा कालावधी वाढत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

यंदा मुख्य विसर्जन मिरवणूक अधिक सुरळीत, शिस्तबद्ध आणि कमी कालावधीत पार पाडण्यासाठी सहभागी मंडळांची संख्या नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत विशेष परवानगीच्या माध्यमातून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सुमारे १५० मंडळांना यंदा ‘नो एन्ट्री’ मिळणार आहे. आता या निर्णयामुळे गणेश मंडळांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed