पुणे: आरोपीला मदत करण्यासाठी तपास अधिकाऱ्याला प्रलोभन; पोलीस हवालदार थेट निलंबित

0
Police-Suspended-660x495.jpg

पुणे पोलिस दलात प्रथमच घडल्याचे मानले जात असलेल्या कारवाईत, अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी तपास अधिकाऱ्याला प्रलोभन दाखविणाऱ्या पोलीस हवालदाराला थेट निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी ही कठोर कारवाई केली असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी “लाच घेणाऱ्यांसोबतच लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

केतन उत्तम धेंडे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. अंमली पदार्थाच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळोवेळी फोन करणे, समक्ष भेट घेणे आणि आरोपीला मदत करण्यासाठी प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तपास अधिकाऱ्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आलेली ही बहुधा पहिलीच थेट निलंबनाची कारवाई मानली जात आहे.

दरम्यान, लोणी काळभोर येथील ‘मैफिल पान शॉप’मध्ये गांजा आणि एमडीसारख्या अंमली पदार्थांचे मिश्रण असलेली पावडर पानामध्ये मिसळून ‘नशेली पान’ नावाने विक्री केली जात असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली १३ मार्च २०२६ रोजी छापा टाकण्यात आला.

या कारवाईत दुकानाचा मालक निशांत दत्तात्रय काळभोर (वय १९, रा. बाजारमळा, लोणी काळभोर) आणि कामगार रामजी संतोष पटेल (वय ३३, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांच्याकडून २६६ ग्रॅम अंमली पदार्थांचा अंश असलेली पावडर, दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच रोहित जवळकर (रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्धही एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. पुढील तपासात आणि मिळालेल्या खबऱ्यांच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मदतीने हिंजवडी येथील अंमली पदार्थयुक्त पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावरही छापा टाकला होता.

या कारवाईमुळे पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Spread the love

Leave a Reply