पुण्यात महिला एपीआय लाचखोरीत अटकेत; 50 हजारांची मागणी एसीबीच्या जाळ्यात

0
IMG_20260515_111830.jpg

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील बावधान पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

ज्योती पांडुरंग तांबे (वय 41) असे अटक करण्यात आलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात बावधान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून मदत करणे, नातेवाईकांना अटक टाळणे आणि न्यायालयात दोषारोपपत्र लवकर सादर करण्यासाठी ज्योती तांबे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता, तांबे यांनी 50 हजार रुपयांपैकी 10 ते 5 हजार रुपये कमी करून उर्वरित 40 ते 45 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने कारवाई करत त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत बावधान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नीता मिसाळ, पोलिस निरीक्षक सुहास हट्टीकर आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी एसीबीच्या टोल फ्री किंवा व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Spread the love

Leave a Reply