“पुणे पोलिसांना झाले तरी काय?” — आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही लाचेचे सत्र सुरूच!

Pune-ACB-Trap-1.jpg

पुणे : शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळणारेच जर पैशांच्या मोहात अडकत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल आता पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे भ्रष्टाचार आणि हप्तेवसुलीबाबत कठोर भूमिका घेत असल्याचा दावा होत असतानाच, आठवड्याभरात तिसऱ्या पोलिसाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने पुणे पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार गणेश शहाजी कस्पटे याला चेक बाऊन्स प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंट बजावू नये आणि अटक टाळावी यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने सापळा रचून पकडले. धक्कादायक म्हणजे, याच प्रकरणात यापूर्वी तब्बल पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप असूनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची ‘भूक’ भागली नसल्याचे चित्र समोर आले आहे.

“एकदा पैसे दिले तरी सुटका नाही, पुन्हा वॉरंट आले आहे” असे सांगत आणखी पैशांची मागणी होत असेल, तर पोलीस ठाणे हे न्यायाचे केंद्र राहिले की वसुलीचे कार्यालय? असा उपरोधिक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पुणे पोलीस दलातील खंडणीखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करत तिघांना बडतर्फ करण्यात आले होते. त्याआधी सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली. तरीही लाचेचे प्रकार सुरूच असल्याने “वरिष्ठांचे आदेश फक्त बैठकीपुरतेच मर्यादित आहेत का?” अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगू लागली आहे.

एका बाजूला सामान्य नागरिकांना नियमांचे धडे दिले जातात, वाहतूक नियम तोडल्यास तात्काळ दंड आकारला जातो; मात्र दुसऱ्या बाजूला काही पोलीस कर्मचारीच कायद्याचा बाजार मांडत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे “पुणे पोलिसांचे ‘सेवा आणि सुरक्षा’ ब्रीदवाक्य आता ‘सेवा की वसुली?’ असा सवाल निर्माण करणारे ठरत आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा पुणे पोलीस दलातील अंतर्गत भ्रष्टाचार उघड झाला असून, आता केवळ निलंबन किंवा बदली नव्हे तर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Spread the love

You may have missed