पुणे कॅम्पमधील भारत पेट्रोलियम कार्यालयाचा ‘ग्राहकांना हैराण’ कारभार; “सेवा की शिक्षा?” असा सवाल

0
IMG_20260424_101703.jpg

पुणे: कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटजवळील सहजानंद कॉम्प्लेक्समधील Bharat Petroleum Corporation Limited (भारत गॅस) कार्यालयाचा कारभार सध्या ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची तक्रार समोर आली आहे. “ग्राहक देवो भव” ही घोषणा केवळ जाहिरातीपुरतीच मर्यादित आहे का? असा उपरोधिक सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.

कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच ग्राहकांची ‘पहिली परीक्षा’ सुरू होते. परिसरात कोणतीही अधिकृत पार्किंग सुविधा नसल्याने वाहन रस्त्यावर उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून थेट कारवाई होत असून, ग्राहकांना तब्बल ₹७३० दंड भरावा लागत आहे. “सेवा घ्यायला आलो की दंड भरायला?” असा प्रश्न ग्राहक उपस्थित करत आहेत.

कार्यालयात प्रवेश केल्यानंतरही परिस्थिती काही वेगळी नाही. एरिया सेल्स ऑफिसर किंवा टेरिटरी मॅनेजर यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना “मीटिंगमध्ये आहेत” किंवा “कॉन्फरन्समध्ये आहेत” असे ठरलेले उत्तर मिळते. मात्र ही ‘मीटिंग’ नेमकी कधी संपणार, याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. परिणामी, ग्राहकांना अनिश्चित काळ वाट पाहण्याची वेळ येते.

याहून गंभीर बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार आहे. नोटीस बोर्डवर लावलेले क्रमांकही महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. “हे कार्यालय आहे की ‘Missing in Action’ विभाग?” असा टोला ग्राहकांकडून लगावला जात आहे.

अनेक गॅस एजन्सींमध्ये एरिया सेल्स ऑफिसरची माहितीही उपलब्ध नसल्याने पारदर्शकतेचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप होत आहे. टेरिटरी मॅनेजर प्रकाश मीना आणि एरिया सेल्स ऑफिसर अभिषेक कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरल्याची माहिती ग्राहकांनी दिली आहे. हेल्पलाईनवर तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एकूणच, “सेवा” देणाऱ्या या कार्यालयात ग्राहकांना “सहनशक्तीची परीक्षा” द्यावी लागत असल्याचे चित्र आहे. भारत पेट्रोलियमने तात्काळ पार्किंग सुविधा, अधिकाऱ्यांची उपलब्धता, कार्यरत संपर्क क्रमांक आणि पारदर्शक माहिती याबाबत सुधारणा करावी, अन्यथा ग्राहकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply