पुणे: पोलीसच गुन्हेगार? पुण्यात निवृत्त ACP सह पाच जणांकडून २.४० कोटींचा गंडा; कायदा राखणाऱ्यांच्याच नावावर प्रश्नचिन्ह!
पुणे: कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांच्याच नावावर फसवणुकीचे गंभीर आरोप नोंदवले जात असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? अशीच संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. पुणे मध्ये जमिनीच्या व्यवहाराच्या आमिषाने तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, सराईत गुन्हेगार नव्हे तर चक्क निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग समोर आला आहे. त्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फिर्यादी अभिजित उंद्रे यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी बोरज येथील १२ एकर जमीन व्यवहारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. “मोठा परतावा” या गोड बोलण्यामागे मात्र कोट्यवधींचा सापळा लपलेला होता. टप्प्याटप्प्याने पैसे उकळल्यानंतर, मूळ जमीनमालक जिवंत असतानाही त्यांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती देत व्यवहार लांबवण्यात आला.
पैसे परत मागितल्यावर मात्र “कायद्याची भाषा” वापरण्याऐवजी थेट जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर ठरतो.
या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, इतक्या मोठ्या कालावधीत (२०१६ ते २०२५) हा प्रकार सुरू असताना पोलीस यंत्रणा नेमकी कुठे होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांचा सवाल:
“सामान्य माणूस फसला तर पोलीस मदतीला येतात का, की अशाच प्रकरणात वर्षानुवर्षे डोळेझाक होते?”
“पोलीस दलातच जर अशी प्रकरणे घडत असतील, तर विश्वास ठेवायचा कुणावर?”
या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेवर टीका होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कडक भूमिका घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.