पुणे: रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचा परवाना रद्द, पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई – वाचा सविस्तर

पुणे – गेल्या वर्षी पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मोठी कारवाई केली आहे. प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 19 मेच्या मध्यरात्री, कल्याणी नगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोन तरुणांना चिरडले होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुलगा शहरातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असल्याने अपघातानंतर राजकीय आणि आर्थिक दबावाचा वापर करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप करण्यात आला.
ससून रुग्णालयात आरोपीचा रक्तनमुना घेण्यात आला होता. मात्र, नंतर समोर आलेल्या माहितीमधून हे उघड झाले की आरोपीच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचा नमुना दिला गेला होता. या प्रकारात डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांच्यावर गंभीर आरोप झाले. पुणे पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून मेडिकल कौन्सिलकडे कठोर कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणातील नाट्यमय घडामोडींनी संपूर्ण शहर हादरून गेले होते. आरोपी अल्पवयीन असल्याने सुरुवातीला त्याला निबंध लिहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती, ज्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर, न्यायालयीन यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परिणामी, पोलिस आणि अन्य तपास यंत्रणांनी याप्रकरणात कठोर भूमिका घेतली.
या प्रकरणात आतापर्यंत आरोपीच्या पालकांसह ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी सर्वत्र केली जात आहे.