पूणे: पत्नीच्या अनैतिक संबंधांचा मानसिक त्रास; रिक्षाचालकाची आत्महत्या – पत्नी व मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

autorickshaw-driver-5038990-202006444996_202009490485.jpg

पुणे : व्याजाने घेतलेल्या पैशांची वसुली करण्याच्या नावाखाली मित्राच्या सततच्या ये-जा आणि पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी रोडवरील सिद्धीविनायक विहार येथे घडली. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्रावर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत रिक्षाचालकाचे नाव सचिन सतिश गिरी (रा. सिद्धीविनायक विहार, हांडेवाडी रोड, हडपसर) असून त्याचे वय अंदाजे ४० वर्षे होते. त्याच्या पश्चात पत्नी कोमल, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. याप्रकरणी मृताच्या बहिणीने – सविता संतोष भारती (वय ३९, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) – हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गिरी याने रवींद्र मेमाणे याच्याकडून काही पैसे व्याजाने घेतले होते. पैसे परत करत असूनही सचिन घरी नसताना रवींद्र सातत्याने त्याच्या घरी जात होता. यामुळे सचिन आणि पत्नी कोमल यांच्यात वाद वाढले. बहिणीने आणि आईने कोमल हिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र काही फरक पडला नाही.

फोनवरुन दिला मृत्यूचा इशारा

१७ एप्रिलच्या पहाटे सव्वा वाजता सचिन याने बहिणीला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी कोमलदेखील कॉन्फरन्स कॉलवर होती. “तिच्या चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत,” असे सांगून सचिनने आपली व्यथा व्यक्त केली. त्यावर कोमलने “मी तुम्हाला घरी येऊन सांगते,” असे सांगून कॉल कट केला. काही क्षणांतच सचिनने “मी फाशी घेतोय,” असे म्हणत पुन्हा कॉल कट केला.

बहिणीने कोमल हिला फोन करून तातडीने घरी जाण्यास सांगितले असता, कोमलने “मरू दे, मला काय फरक पडत नाही,” असे म्हणत फोन बंद केला.

दरवाजा बंद, आतून साडी बांधून मुलीला सोडले

सकाळी घरी गेल्यावर दार बंद असल्याचे लक्षात आल्यावर आईने टेरेसवरून सचिनच्या मुलीला साडीच्या सहाय्याने गॅलरीत उतरवले. तिने आत पाहिले असता सचिनने बेडरुममधील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

या प्रकरणी कोमल सचिन गिरी आणि रवींद्र मेमाणे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गायत्री बैरागी या पुढील तपास करत आहेत.


Spread the love

You may have missed