पुणे महापालिकेत बनावट पत्राद्वारे भरतीचा प्रकार उघड; महापालिकेचा दावा: आम्हाला बनावट पत्र मिळालेले नाही; बंडगार्डन पोलिस ठाण्यात जिल्हा परिषदेची तक्रार दाखल

PMC.webp

पुणे: महापालिकेत समाविष्ट 23 गावांमधील कर्मचार्‍यांना सेवेत घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी, लेटर हेड आणि शिक्के वापरून पुणे महापालिकेला फसविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

23 गावांचा समावेश आणि भ्रष्टाचाराचा प्रकार
2021 मध्ये पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेच्या ठरावानुसार महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले. मात्र, या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याने बोगस कर्मचार्‍यांची भरती करण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे सुमारे 600 कर्मचार्‍यांना सेवेत घेण्यास स्थगिती देण्यात आली.

47 कर्मचार्‍यांची बनावट यादी
जिल्हा परिषदेकडून 14 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे महापालिकेला 47 कर्मचार्‍यांची भरतीची यादी पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या पत्रावर एस. एस. घुले यांची स्वाक्षरी आणि लेटर हेड होते. मात्र, खरात यांच्या तक्रारीनुसार, घुले यांची बदली 2021 मध्ये सातारा जिल्हा परिषदेत झाल्याने ते त्या वेळी पुणे जिल्हा परिषदेत कार्यरतच नव्हते. त्यामुळे या पत्रात वापरलेली स्वाक्षरी व शिक्का बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

महापालिका प्रशासनाचा खुलासा
“दैनिक पुढारी” ने दिलेल्या वृत्तानुसार, महापालिकेने या पत्राचा इन्कार केला आहे. “संबंधित पत्र आम्हाला मिळालेले नाही, तसेच त्याची नोंद महापालिकेच्या कोणत्याही विभागात झालेली नाही. त्यामुळे या 47 कर्मचार्‍यांची भरती करण्यात आलेली नाही,” अशी माहिती महापालिकेच्या सेवकवर्ग विभागाकडून देण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

Spread the love

You may have missed