पुणे: खराडी बायपास – अवजड वाहनांना प्रवेशबंदी: वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; कामचुकार वाहतूक कर्मचाऱ्यांवर उपायुक्तांची करडी नजर

खराडी – चंदननगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात २४ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामध्ये दहापेक्षा जास्त चाकी वाहने, मल्टी-अॅक्सेल ट्रक, कंटेनर, ट्रेलर आणि बल्कर आदींचा समावेश आहे. तसेच सहा ते दहा चाकी मालवाहू वाहनांना मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळेतच ठरावीक मार्गांवर वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वाहतूक सुधारण्यासाठी संयुक्त प्रयत्न
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभाग, महापालिका आणि अन्य संबंधित विभागांकडून संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक शाखेने शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करत अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयात मुंबई-बंगळुरू महामार्गाचा अपवाद ठेवण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांनी काही भाग ‘रेड झोन’ म्हणून घोषित केले असून, या भागात प्रवेश मिळवण्यासाठी वाहनचालकांना वाहतूक शाखेकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी स्पष्ट केले.
अत्यावश्यक सेवांना सूट, पण ठराविक मार्गच
अत्यावश्यक सेवांसाठी असलेल्या जड वाहनांना रात्री १२ ते सकाळी ६ या कालावधीत ठराविक मार्गांवरूनच प्रवेश दिला जाणार आहे. हे वाहन नगर रस्ता, खराडी बाह्यवळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, येरवडा, आळंदी रस्ता, होळकर पूल, खडकीमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील. तसेच, सोलापूर रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी हडपसर, भैरोबा नाला, लुल्लानगर, गंगाधाम चौक, मंतरवाडी, सासवड रस्त्याचा पर्याय उपलब्ध असेल.
या मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
शहरातील काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये खालील भागांचा समावेश आहे :
नगर रस्ता: विमाननगर चौक ते दत्त मंदिर चौक
शास्त्रीनगर चौक: कल्याणीनगरकडे जाण्यास बंदी
येरवडा: पर्णकुटी चौक ते कोरेगाव पार्क
वडगाव शेरी: बिशप शाळेकडे जाण्यास बंदी
पेट्रोल साठा चौक: लोहगाव विमानतळ रस्ता
जुना मुंबई-पुणे रस्ता: पाटील इस्टेट ते शिवाजीनगर अभियांत्रिकी चौक
गणेशखिंड रस्ता: ब्रेमेन चौक ते विद्यापीठ मार्ग
औंध-वाकड रस्ता: महादजी शिंदे पूल
बाणेर रस्ता: राधा चौक ते बाणेर
पौड रस्ता: नळ स्टॉप व विधी महाविद्यालय मार्ग
सिंहगड रस्ता: राजाराम पूल ते स्वारगेट
सातारा रस्ता: मार्केट यार्ड चौक ते स्वारगेट
सोलापूर रस्ता: सेव्हन लव्हज चौक ते टिंबर मार्केट
वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे वाहनचालकांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.