अलिबागमध्ये बनावट सोन्याच्या आमिषाने १ कोटी ५० लाखांची लूट – दोन पोलिसांसह चौघांना अटक; फिर्यादी थेट पोलीस अधीक्षकांकडे

n6512729451739108418211e0ac60a1b893fbaafde7abb7f8e1d51c3fca3301ba912bcffa657f669a1c6b3d.jpg

अलिबाग: बनावट सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून नागपूरच्या ज्वेलर्सला गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने दोन पोलिसांसह चौघांना अटक केली आहे. तर एका पोलीस हवालदाराचा शोध सुरू आहे.

“दैनिक लोकमत” दिलेल्या वृत्तानुसार, अटक आरोपींमध्ये समाधान पिंजारी, शिवकुमार उर्फ दीप गायकवाड, पोलीस अंमलदार समीर म्हात्रे आणि विकी साबळे यांचा समावेश आहे. या चौघांना न्यायालयात हजर केले असता समाधान पिंजारी व दीप गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत तर पोलीस अंमलदार समीर म्हात्रे व विकी साबळे यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

या प्रकाराची अशी झाली होती योजना
नागपूरमधील ज्वेलर्स नामदेव हुलगे यांच्याशी समाधान पिंजारीने १५ दिवसांपूर्वी संपर्क साधून, ७ किलो सोने अतिशय कमी किमतीत उपलब्ध असल्याचे सांगितले. आमिषाला बळी पडून हुलगे यांनी दीड कोटी रुपयांची रोकड घेत अलिबागकडे प्रयाण केले.

मंगळवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास तिनवीरा डॅम परिसरात आरोपींनी गाडी थांबवली. समाधान पिंजारीने पोलिसांचे चेकिंग सुरू असल्याचे सांगत सोने घेऊन येण्यासाठी थांबण्यास सांगितले. याच दरम्यान, समीर म्हात्रे आणि विकी साबळे हे पोलीस गणवेशात तेथे पोहोचले. त्यांनी हुलगे आणि त्यांच्या साथीदारांना संशयाच्या आधारावर खाली उतरवले आणि अंगझडती घेण्यास सुरुवात केली.

रोख रक्कम घेऊन गाडी फरार
चौकशीच्या बहाण्याने संशयित पोलिसांनी हुलगे यांना गाडीबाहेर काढले, तर यावेळी दीप गायकवाडने इनोव्हा गाडी सुरू करून दीड कोटी रुपयांची रोकड घेऊन पनवेलच्या दिशेने पलायन केले. पोलीस असल्याचा बहाणा करत उभ्या पोलिसांनी पाठलाग करतो, असे सांगून घटनास्थळ सोडले.

फिर्यादीने थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली
लुट झाल्याचे लक्षात आल्यानंतर नामदेव हुलगे यांनी त्वरित रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. प्रकरण गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला. विशेष पथक तयार करून पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत चौघांना अटक केली आहे. फरार हवालदाराला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Spread the love

You may have missed